(0233)-2312512 ansvarta@gmail.com Sangli, Maharashtra, India
- - About Us - -

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकाने यंदा ३० वर्षे पूर्ण केली आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेले हे मासिक ग्रामीण भागात मोठ्या संख्येने वाचले जाते. सांगली येथून गेली ३० वर्षे दरमहा नियमितपणे प्रकाशित होणारे हे मासिक आहे. याची वार्षिक वर्गणी रु. ४०० आहे.(यामध्ये दरमहा ३६ पानी अंक आणि दिवाळीच्या वेळी २५० पानी वार्षिक अंक मिळतो.) अशा वार्तापत्राविषयी थोडेसे...

समाजातील प्रस्थापित मूल्यांविरोधात संघर्ष करणाऱ्या कोणत्याही चळवळीला तिच्या सुरुवातीच्या काळात अनुल्लेखानेच मारले जाते. तिने उपस्थित केलेले प्रश्न जणू अस्तित्वातच नाहीत, असे भासवले जाते. पण जसजशी चळवळ मूळ धरू लागते, तिने उपस्थित कलेल्या प्रश्नांना शोषित, पीडित जनतेचा पाठिंबा मिळू लागतो, तसतशी त्या चळवळीची दखल घेणे प्रस्थापित व्यवस्थेला भाग पडते आणि नंतर त्या चळवळीवर चोहोबाजूंनी हल्ला चढवला जातो. तरीही चळवळ अनेक पातळ्यांवर पसरत जाते, मूळ धरू लागते. वाढत्या चळवळीला संघटित करण्याची गरज निर्माण होते. रस्त्यावरील आंदोलनांच्या अनुभवातून चळवळीची वैचारिक मांडणीही होऊ लागते. प्रस्थापित माध्यमे वाढत्या चळवळीला हातभार लावतातच, असे नाही; परिस्थिती उलटच असते. चळवळीच्या कार्यक्रमांना, आंदोलनांना योग्य प्रकारे पोचविलेच जात नाही. अनेक आरोप-प्रत्यारोप होऊ लागतात. अशा वेळी चळवळीला आपल्या मुखपत्राची गरज भासू लागते. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळही याला अपवाद नाही.

साधारणत: १९८९ च्या सुमारास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची संघटनात्मक वाटचाल डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली चालू झाली. साऱ्या महाराष्ट्रभर डॉ. दाभोलकर फिरू लागले, व्याख्याने, शिबिरे होऊ लागली, बुवाबाजी, भानामतीची, नरबळीची अनेक प्रकरणे बाहेर येऊ लागली, संघर्ष उभे राहू लागले. विविध ठिकाणी शाखा उभ्या राहू लागल्या. अनेक नवीन ताज्या दमाचे तरुण सहकारी चळवळीत सामील होऊ लागले, नवनवीन कृतिशील कार्यक्रम कार्यकर्ते हाती घेऊ लागले. त्यातून प्रस्थापित मूल्यांना आव्हान मिळू लागले. हे सर्व जनतेपर्यंत पोचविण्याची, नव्या कार्यकर्त्यांना वैचारिक मार्गदर्शनाची गरज भासू लागली.

या गरजेतून अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा (अंनिवा) जन्म झाला. केवळ चार पानांच्या सायक्लोस्टाईल मजकुरापासून सुरु झालेले हे मासिक गेली ३० वर्षे हे काम अव्याहतपणे करीत आहे. 'अंनिवा'चा पहिला अंक 'कवडसे' या नावाने ऑगस्ट १९८९ मध्ये निघाला. १९९२ पासून 'कवडसे' हे नाव बदलून 'अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र' या नावाने हे मासिक प्रसिद्ध होऊ लागले.

शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व अंगीकार, धर्माची विधायक चिकित्सा, परिवर्तनाच्या व्यापक चळवळीशी जोडून घेणे, ही अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची चतु:सूत्री आहे. या चतु:सूत्रीची अंमलबजावणी प्रबोधन, संघटन आणि कृतिशील संघर्ष यातूनच होऊ शकते. त्यामुळे याबाबत चळवळीत घडलेल्या घटना जनतेपर्यंत आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोचविणे हे मुखपत्राचे काम आहे. पण केवळ घटनेचे रिपोर्टिंग करणे, एवढाच 'अंनिवा' चा उद्देश नाही, तर त्या घटनांमागची कारणमीमांसा विज्ञानाच्या सहाय्याने स्पष्ट करणे व त्या बाबतची कारणे नष्ट करण्यासाठी होत असलेल्या संघटित विवेकी प्रयत्नांना वैचारिक बळ पुरविणे, हे काम 'अंनिवा' गेली ३० वर्षे करीत आहे.

सुरुवातीच्या काळात 'महाराष्ट्र अंनिस' अघोरी अंधश्रद्धांविरोधी चळवळ राबवीत होती. भुताने झपाटणे, अंगात येणे, भूत काढणाऱ्या अघोरी प्रथा, बुवाबाजी, मांत्रिक, चमत्कार आणि त्यांचा भांडाफोड, त्या संदर्भातील वैचारिक-वैज्ञानिक मांडणी, प्रबोधन, परिषदा, यात्रा, संघर्ष या गोष्टी चळवळीत घडत होत्या, साहजिकच त्याचे प्रतिबिंब वार्तापत्रात पडत होते. चळवळीच्या पुढच्या टप्प्यात 'अंनिस'ने विधायक धर्मचिकित्सेला व विधायक धर्मचिकित्सा करण्याच्या समाजसुधारकांच्या व अवैदिकांच्या भारतीय परंपरेला प्राधान्य दिले. या परंपरेशी आपल्याला जोडून घेतले. त्या चार्वाक-बुद्ध-कबीर-तुकाराम-फुले-शाहू-आंबेडकरी परंपरेचा आलेख मांडण्याचे काम 'अंनिवा' ने केले. त्या अनुषंगाने धर्मातील शोषण करणारी व निरर्थक कर्मकांडे, धर्मांधता व त्याच्या सहाय्याने फोफावत असलेला दहशतवाद, धर्मस्थळे व तेथील गैरप्रकार, शोषण, त्याठिकाणी स्त्रीला देण्यात येणारे दुय्यमत्व, धार्मिक उत्सव आणि त्यातील भपकेबाजपणा, बाजारूपणा यावर' अंनिवा'ने टीकेची झोड उठविली व कालानुरूप धार्मिक उत्सवात केवळ बदलच नव्हे, तर धर्माचे स्वरूपच मानवकेंद्री करण्यासाठी कृतिशील धर्मचिकित्सेसाठी जनजागरण मोहीम उभारली. त्यातील आपला वाटा 'अंनिवा'ने नेटाने उचलला व देव-धर्मचिकित्सा म्हणजे देव-धर्म नाकारणे नव्हे, तर देव-धर्म या संकल्पना समजावून घेऊन त्या नैतिक मूल्यांच्या, शोषणविरहीत समाजाच्या, स्त्री-पुरुष समतेच्या प्रस्थापनेसाठी वापरणे याबाबतचे प्रबोधन 'अंनिवा'ने केले.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व अंगीकार या 'अंनिस'च्या सूत्राचा प्रसार 'अंनिवा'ने मानवी प्रगतीचे दाखले देत, आधुनिक वैज्ञानिक संकल्पनांचे तपशील देत, जगभरातील शास्त्रज्ञांची कार्ये, चरित्रे, संघर्ष, त्याग यांची माहिती देत, बुरसटलेल्या रुढी, परंपरा, समजुती यांची वैज्ञानिक चिकित्सा करीत केला. विज्ञानाच्या भाषेचा वापर करीत अक्युपंक्चर, चुंबकचिकित्सा, रेकी वगैरेंसारख्या फसव्या विज्ञानाचा सुळसुळाट सुरू आहे. त्या फसव्या विज्ञानाचे स्वरूप उघड करण्याचे काम 'अंनिवा'ने केलेले आहे. विज्ञानाचा वापर करून मानवी जीवन जास्तीत जास्त सुकर, सुंदर, ज्ञानमय, चिकित्सक, समतेवर आधारलेले, शोषणविरहीत करणे यासाठीच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व अंगीकार करण्याचे सूत्र 'अंनिस'ने स्वीकारले आहे व 'अंनिवा' मोठ्या तडफेने त्याचा पाठपुरावा करीत आहे.

समकालीन व समविचारी संघटना, चळवळी, आंदोलने यांच्याशी जोडून घेणे हे 'अंनिस'चे चौथे सूत्र; मग ती पर्यावरणवादी असोत, स्त्रीवादी असोत, कामगारांची असोत किंवा दलित-आदिवासींच्या हक्कांसाठीची; त्यांच्यावरील अन्याय-अत्याचारांच्या विरोधातील असोत. जे-जे आंदोलन, संघटना मानवी शोषणमुक्तीचा नारा देत कार्यरत आहेत, त्यांच्याशी आपली नाळ जोडण्यासाठी 'अंनिवा'ने त्यांच्या आंदोलनाचे तपशील देत त्यांच्याशी जोडून घेण्याचे प्रयत्न केले आहेत.

डॉ. दाभोलकरांचा खून हा 'अंनिस'ला; पर्यायाने 'अंनिवा'ला बसलेला सर्वांत मोठा धक्का होता. पण त्या धक्क्यातून सावरत डॉ. दाभोलकरांनी सुरू केलेली कायद्याची आणि जातपंचायतीच्या विरोधातील लढाई कार्यकर्त्यांनी एका यशस्वी टप्प्यापर्यंत आणून ठेवली. त्या लढाईत 'अंनिवा'चा वाटा मोठाच आहे. 'अंनिस' कायद्याच्या लढाईच्या संदर्भात एक दोनशे पानी पुस्तक होईल, इतका मजकूर 'अंनिवा' ने छापला आहे. 'अंनिवा'चे वार्षिक अंक हेही तितकेच दर्जेदार झालेले आहेत. 'अंनिस'च्या चारही सूत्रांची एकत्रित झलक नक्कीच या वार्षिक अंकातून पाहण्यास मिळेल.

अशा या परिवर्तनवादी मासिकाचे आपण सभासद होऊन या सामाजिक कार्यास हातभार लावावा, ही विनंती.

- संपादक

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र

ansvarta@gmail.com

0233-2312512